Posted by vipulnaik on 2026-02-07 00:45:49 |
Share: Facebook | Twitter | Whatsapp | Linkedin Visits: 139
मृत्यू हे अंतिम सत्य असलं तरी ते सत्य स्वीकारनं खूप दुःखदायक आहे. आपल्या जवळची माणसं आपल्याला कायमचं सोडून जाणार, नजरेपासून दूर होणार, हे खूप वेदनादायी असतं. भीमरावांच्या रामूनं भीमराव, त्यांचा संसार हे सगळं सावरलंच पण रमाईच्या आयुष्यात त्यांची या वेदनादायी 'मृत्यूशी' सतत भेट होते.
रमाईंच्या आयुष्यात त्यांनी जवळच्या एक दोन नव्हे 10 माणसांचे मृत्यू पाहिले.. पण त्या केवळ रडत बसल्या नाहीत, त्या दुःखातून त्या सावरल्या, पुन्हा खंबीर उभ्या राहिल्या.
बालपणी मृत्यू काय असतो? हे कळत ही नव्हतं तेव्हा रामुच्या #आई_रुक्मिणी चं निधन होतं, लगेच पुढच्याच वर्षी वडील #भिकू_धुत्रे यांचं निधन होतं. आई बाबा विना पोरकी झालेली रमा रामजी सुभेदारांची सून होऊन येते. भीमरावांशी संसार सुरू होतो अन काही दिसांनी 1913 साली त्या भरल्या घरात आधार असणारे सासरे #रामजी_सुभेदार यांचं निधन होतं.
सासरे सुभेदार यांच्या मृत्यूनंतर घरात मोठा माणूस म्हणून असणारे, बाबासाहेब अमेरिकेला गेल्यानंतर घरातला कर्ता पुरुष म्हणून उभा राहिलेले भीमरावांचे मोठे भाऊ #आनंदराव हे ही या काळात आजारपणात गेले.
माहेरी आई विना पोरकी झालेली रमा सासरी ही सासूच्या आधाराला पारखी होती, कारण भीमरावांची आई भीमाबाई यांचं भीमराव पाच वर्षाचा असतांनाच निधन झालं होतं. रामजी सुभेदार यांच्या दुसऱ्या पत्नी म्हणजे रमाईंच्या सावत्र सासू #जिजाबाई या ही निवर्तल्या, रमाने सर्व क्रियाकर्म केलं.
पुढे काही दिवसांतच दीर आनंदराव यांचा मुलगा म्हणजे रमाईचा पुतण्या #गंगाधर बालपणीच आजारपणाने गेला.
या सगळ्या मरणांहून मोठं दुःख पोटची लेकरं गमावण्यात आहे.. याच काळात भीमा-रमाची #रमेश, #गंगाधर, #राजरत्न ही 3 मुलं आणि मुलगी #इंदू ही चार लेकरं गेली. एक आई म्हणून रमाई किती खाचायला हवी पण रमाई या दुःखातूनही सावरते. साहेबांना साथ देते. इथे एक गोष्ट सांगणं खूप महत्वाचं आहे, लाडका मुलगा राजरत्न याच्या मृत्यूनंतर रमाई तर दुःखी होत्याच पण आपल्या नजरेसमोर आपलं बाळ उपचाराविना गेलं, लाडका मुलगा राजरत्न गेला हे दुःख स्वतः बाबासाहेब मात्र पचवू शकले नाहीत. आपले मित्र दत्तोबा पवार यांना बाबासाहेब पत्र लिहितात आणि त्या पत्रात ते लिहितात "मुलगा राजरत्न गेल्यापासून माझं संसारातलं चित्तच उडालं आहे, तेव्हापासून माझं मन कशातच लागत नाही. आता काही नवीन करण्याची आशा उरली नाही, संन्यस्तवृत्तीने जगावं असं मला वाटतं. एवढंच नाही तर प्रत्यक्षात ही बाबासाहेब राजरत्न गेल्यानंतर सन्यस्तवृत्तीने जगायला लागले. म्हणजे बाबासाहेब आपल्या मुलांच्या मृत्यूने खचायला लागले होते. पण माता रमाईचं त्या काळातही बाबासाहेबांचा आधार होतात. आणि खंबीर उभ्या राहत त्या साहेबांना धीर देतात. त्या बाबासाहेबांना म्हणतात "तुम्ही दुःख करत बसला तर कसं होईल, दुःख करायला जे थांबतात ते जीवनात काहीच करू शकत नाहीत. तुम्ही या दुःखातून बाहेर पडा साहेब, त्यातच आपलं आणि साऱ्या समाजाचे हित आहे."
तुम्ही आजवर अनेकांकडून रडणारी, गरीब, अडाणी, अशिक्षित रमाई ऐकली असेल पण अशी इतकी धैर्यवान, खंबीर स्त्री आजवर तुमच्या आयुष्यात तुम्ही पाहिली आहे का.? वाचली आहे का? अशा खंबीर धैर्यवान धीरगंभीर आणि बाबासाहेबांना सावरणारी होती माझी माता रमाई ! यातील काही मृत्यूत तर रमाई एकट्याच असतात. त्या सगळं पार पाडतात, स्वतःला सावरतात अन पुन्हा उभं ही राहतात, परदेशी असणाऱ्या साहेबांना ही वार्ता कळवतात आणी त्याच पत्रात त्या स्व:ताच साहेबांना ही धीर देतात, तुम्ही खचू नका असं लिहितात.
अशा कर्तृत्ववान खंबीर महामाता रमाईंना आज जयंती निमित्त विनम्र अभिवादन!
युवा कवी, गायक, लेखक, आंबेडकरी शायर
मुकेश संतोष हातोले